Tuesday, September 25, 2012

पाचव्या वाढदिवसाबद्दल मनातलं थोडस.....


        आज आपल्या या "आपलीमराठी" उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण झाली, मागे वळून पाहिले तर समजलेच नाही कि हि पाच वर्षे कशी पटकन निघून गेली. समाधान आहे कि आपल्या प्रेक्षकांनीही हि पाच वर्षे खूप आनंदात घालवलेली आहेत. आजही मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो जेव्हां मी माझा पहिला ब्लॉग पोस्ट लिहिला होता. त्यामध्ये मी हे संकेतस्थळ काढण्याचा उद्देश लिहिला होता आणि पाच वर्षे मागे वळून पाहताना  आम्हाला  खूप आनंद होत आहे. जे आपली मराठीचे अगदी पाहिल्यापासुनचे प्रेक्षक आहेत त्यांना लख्खं आठवत असेल  की २००७ साली फक्त आणि फक्त  ३ ते ४ चित्रपट होते जे मराठी प्रेक्षक ऑनलाईन पाहू शकत होते.  तसे भारताबाहेर राहणाऱ्यांसाठी सिनेमा/नाटक पाहण्यासाठी पर्याय  नव्हताच मुळी,  भारतात सहज मराठी चित्रपट पाहता येतात पण भारताबाहेरच्या लोकांचे काय? बाकी सर्व भाषेतले सिनेमे जर सहजासहजी मिळत असतील तर मराठी का नाही? आम्हाला हाच प्रश्न भेडसावत होता.

         २६ सप्टे २००७ उजाडले  आणि आम्हाला उत्तर मिळाले "आपलीमराठी" , मग एका पेजने आपलीमराठीची   सुरवात झाली आणि तुमच्यासारखे खूप मित्र मिळत गेले ज्यांनी मराठी मनोरंजनाला आपलेसे  केले आणि आज संकेतस्थळावर ५०० हूनही अधिक चित्रपट आहेत ,वेगवेगळ्या मालिका व नाटके आहेत आणि हे रोज अपडेट  केले जातात न चुकता  न थांबता रोज म्हणजे रोज............

         आपलीमराठी चालवणे हे सोपे काम तर नक्कीच नव्हते कारण एकतर  तुटपुंजे  आर्थिक बळ , त्यात पाहणारे लोक कमी आणि कामात सातत्य देनारे लोक,  मला वाटते कि सर्व मराठी लोक जे आपले असे काही वेगळे  करायला जातात त्यांना वरील सर्व  संकटे जरूर भासत असतील , पण कसे तरी मजल दर  मजल  करत आम्ही ते उभे करत राहिलो . तुम्हाला वाचून खूप आश्चर्य वाटेल कि जेव्हा मी एकटा आपलीमराठी चा भार उचलत होतो तेव्हा माझे एकच ध्येय होते कि कुणी नाराज नाही झाले पाहिजे आणि सर्व काही  आपलीमराठीवर वेळेवर यायला हवे . खूपश्या मालिका भारतातील दुपार च्या वेळी येत असत तेव्हां  अमेरिकत पहाट असे तर मी ४ वाजता उठून  त्या मालिका तुमच्या साठी रेकॉर्ड करत असे . माझा एक आणि एकच मंत्र असे कि कोणत्याही कामात सातत्य महत्वाचे आहे, कारण आज केले आणि उद्या केले नाही तर मी एक एक करून जे मराठी लोक मराठी साहित्या जवळ आणत होतो ते दूर जाण्यास वेळ लागला नसता.

           तसा  मी काही पट्टीचा वेब साईट डेव्हलपर वगैरे नाही पण एक एक करून सर्व शिकत गेलो, आणि एकच  ध्यास ठेवला, आणि विश्वास बसत नाही कि आज मी ५ वर्ष पूर्ण चा लेख लिहित आहे. आणि हो आपलीमराठी सोबत खूपशी संकेत स्थळ आली आणि आपलीमराठीची नक्कल करण्याचा प्रयत्न  केला. पण मी म्हणालो ना कि सातत्य आणि फोकस हा कमी  कामा नये , आम्ही आपलीमराठीवरचा एक एक भाग अगदी विचारपूर्वक बनवला, आणि वरचे वर बदल करत राहिलो आणि अडथळे म्हणाल तर विचारूच नका , आमच्याकडे एवढे पैसे नव्हते कि आम्ही खूप चांगला सर्व्हर  घेऊ शकत होतो  त्यामुळे कमी किमतीतील सर्व्हर मुळे आपलीमराठी वरचे वर बंद पडत असे. शनीवार व रविवारी खूप गर्दी होत  असायची  आणि मग सर्व्हर आपला जीव मुठीत घेऊन शांत बसत असे, आणि एकदा सर्व्हर डाऊन झाला कि आमचा जीव खाली वर होत असे . आणि स्वस्त  दरातील प्रोव्हायडर त्या प्रमाणे तो दुरुस्त करत असत. पण ह्या सर्व गोष्टीवर आम्ही हळू हळू मात करत राहिलो, आणि प्रवास पुढे पुढे जात राहिला असो ..

           महत्वाचे  सांगायचे म्हणजे या सर्वांचे आणि आपलीमराठीच्या ५ वर्षांच्या यशाचे  श्रेय जाते ते  आपल्या गुणी  प्रेक्षकांना कारण त्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले.  जेव्हां तोंड भरून कौतुक केले तेव्हां आमच्यातला उत्साह वाढला, तर वेळोवेळी सूचनाही केल्या, ईमैल केले,  तक्रारी केल्या ज्याने आपलीमराठी अजून सुबक झाली, त्रुटी कळाल्या आणि हे कार्य करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले.   आपलीमराठी आपलीच आहे आणि आपण सर्वांनी मिळून तिला अशीच पुढे नेऊन तीचा २५ वा वाढदिवस असाच साजरा करू .

            आज आपण सगळेच पाहत आहोत मराठी चित्रपटसृष्टीही बदलत आहे. तरुण कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, संगीतकार, गायक या सर्वांनी मराठीच रूप पालटवले  आहे . मराठी वाहिन्याही दर्जेदार मालिका व कार्यक्रम देत आहेत विविध  उपक्रम राबवत आहेत  .आज आपण सर्वच याचा आपलीमराठीवर  आस्वाद घेत आहोत. आज  मराठी चित्रपटही यशस्वी होत आहेत व रसिकांचे यात योगदान आहे. अशीच आपली मराठी फुलात राहो हि आशा .......

          जेव्हा आपलीमराठी ने पाच वर्षांपूर्वी  सुरवात केली तेव्हा मायाजाळावर अगदी  ४-५ सिनेमे च असतील पण आज जर पाहिलेत तर मराठीचे अगदी वादळच आले आहे आणि  या त आपलीमराठी चा कुठे ना कुठे  तरी हात आहे. ज्यामुळे सर्वांना  कळाले कि भारता बाहेरचा मराठी प्रेक्षक  सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने  मराठी सिनेमे , नाटक पाहतो.

           मला असे वाटते कि या मायाजाळावर असणाऱ्या ७.३ करोड संकेतस्थळामध्ये  आपलीमराठीने सर्वांत जास्त  मराठीचे सर्व वेगळे प्रकार आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करून आपले एक अढळ स्थान सिद्ध केले आहे.
तुम्हालाही हे मान्य असेल ना ?

सरते शेवटी एवढेच समाधान आहे…की “आपलीमराठी” मुळे खुप मराठी प्रेमी खुश आहेत…..

आपली मराठी च्या पाचव्या वाढदिवसाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमची साथ अशीच मिळत  राहो हीच अपेक्षा!!

एक मराठी प्रेमी
www.ApaliMarathi.com
प्रत्येकाच्या मनाच्या अगदी जवळ
आपलीमराठीला हातभार लावण्यासाठी येथे जा